Music Launch of Asa Mee Ashi Tee

आजच्या तरुणवर्गाला समोर ठेवून सोबतच कौटुंबिक मनोरंजनाचा विषय असणारे सिनेमे सध्या बनत आहेत. अशाच पठडीतला परंतु वेगळ्या विषयावरचा “असा मी अशी ती” हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचित पाटील, पल्लवी सुभाष, मानसी साळवी अशी युवा कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाची गाणी सध्या सर्वत्र गाजत आहेत. नुकताच अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या ध्वनिफित प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले.
प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. पण हे प्रेम प्रत्येकाच्याच नशिबात असते असे नाही. आपल्या आयुष्यात मिळणार्‍या गोष्टी या नशिबावर अवलंबून असतात, असे आपण मानतो. प्रत्येक माणसाचे नशिब ही नियती ठरविते असे आपण नेहमी म्हणतो. तसच दुसर्‍या बाजूला नियतीपेक्षा स्वकर्तुत्व मोठ असत आपल नशीब आपण घडवत असतो असे सांगणारा वर्ग ही आपल्याकडे आहे. या विचारधारेवर सिनेमाची कथा घडत जाते. प्रेम कथेला रहस्याची जोड असलेल्या या सिनेमात चार गाणी असून अमितराज या आजच्या पिढीच्या संगीतकरणे स्वरबद्ध केली आहेत.
या चित्रपटातील “मौला मौला” हे सुफी आणि रॉक म्युझिकचे फ्युजन असलेले आणि सध्याचे प्रसिद्ध ठरलेले हे गीत हिंदीतील सुप्रसिद्ध गायक जावेद अली आणि शिल्पा पै यांनी गायले आहे. तर “जीव एकटा” हे  भावपूर्ण गीत आदर्श शिंदे आणि शिल्पा  पै यांनी गायिले आहे. अभिनेता दिग्दर्शक अशी ओळख असलेले अतुल काळे यांनी देखील या सिनेमासाठी पार्श्वगायन केले असून “कधी कधी” हे गीत गायले आहे, तसेच “जिंद मेरी ए” या गाण्यातून जयदीप, अमितराज, शिल्पा पै यांच्यासोबातीने त्यांनीही सूर छेडीले आहेत. सिनेमातील “मौला मौला” हे गीत सचिन दरेकर यांनी लिहिले असून उर्वरित तीन गाणी मंदार चोळकर  यांनी लिहिली आहेत. “व्हिडीओ पॅलेस” च्या वतीने या सिनेमाची ध्वनिफित बाजारात आली असून 56060 या क्रमांकावर AMAt असा SMS केल्यास ही गाणी कॉलर टयुन आणि रिंगटोन साठीही उपल्बध असणार आहेत.
अतुल कमळाकर काळे दिग्दर्शित “असा मी अशी ती” ची कथा सचित पाटील यांची असून कथा विस्तार आणि पटकथा सचित पाटील, अतुल कमळाकर काळे आणि आशिष रायकर यांची आहे तर संवाद सचित दरेकर यांनी लिहिले आहेत. सिनेमाच्या छायांकनाची जवाबदारी केदार गायकवाड यांनी सांभाळली आहे. सौ. उषा सतीश साळवी यांच्या “श्री स्वामी समर्थ पिक्चर्स” ची निर्मिती असलेला “असा मी अशी ती” हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित आहे.