Shri Gananayaka Music Album Launch

सुमधूर गीतांचा श्री गणनायका अल्बम लाँच

सुमधूर गीत, संगीताचा मिलाफ असलेली, त्याचबरोबर मराठी व हिंदीचे फ्युजन असलेली आणि गणरायावरील अपार श्रध्देतून बनलेली ‘श्री गणनायका’ मधील सर्व गाणी अतिशय उत्साहवर्धक झालेली आहेत. श्रेयस आणि प्रीत या जोडगोडीने पदार्पणातच् दमदार कामगिरी केली आहे असे सांगत, त्यांच्या पुढील वाटचालींसाठी दिग्दर्शक राजीव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाचे औचित्य साधत ‘प्रतिभा फाऊंडेशन’ आणि ‘टाईम्स म्युझिक’ प्रस्तुत ‘श्री गणनायका’या भक्तीरसाने ओतप्रोत भरलेल्या मनमोहक गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी ‘प्रतिभा फाऊंडेशन’च्या उषा देशपांडे, ‘टाईम्स म्युझिक’च्या वर्षा पौडवाल, विजय निकम, भारतीय युवा मोर्चा चे प्रदीप पानसांडे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेते पंकज विष्णु इ. उपस्थित होते. श्री गणनायकाची मूळ कल्पना श्रेयस आंगणे याची असून या अल्बममधील सर्व गीते ही श्रेयस यांचीच आहेत. याशिवाय या भक्तीरसात आकंठ बुडालेल्या या गीतांना संगीताचा साज चढवलाय श्रेयस आीण प्रीत या व्दयींनी.
‘श्री गणनायका’ चे हटकेपण हे त्याच्या गाण्याच्या सादरीकरणाबरोबरच यामधील गायकांचेही आहे. हिंदी, बंगाली तसेच ओरिसा या भाषेत प्रामुख्याने गाणाऱ्या जावेद अली, कृष्णा ब्यौरा या दिग्गज गायकांनी आणि सुरेश वाडकर, सचिन खेडेकर, शंकर महादेवन, बेला शेंडे, सुहास सावंत या प्रतिथयश गायकांनी गणराजाला दिलेली ही एक प्रकारे मानवंदनाच आहे.
हिंदीमध्ये आजकाल सुफी संगीताचा ट्रेंड असून मराठीतही सूफी संगीत आणण्याचे श्रेयस आीण प्रीत या जोडगोडीचे स्वप्न ‘श्री गणनायका’ मुळे पूर्ण झाले आहे. पारंपरिकता हा गणेशोत्सवाचा अविभाज्य असा भाग आहे. पण गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाची संकल्पना ही आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. या महत्त्वाच्या आणि अत्यंत जरूरी अशा नोंदींवरही ‘श्री गणनायका’ मध्ये सूचक भाष्य रंजक पद्धतीने काव्यातून सांगितले गेलं आहे.
एकुणातच श्री गणराजाच्या आगमनासाठी आज तमाम जनता उत्सुक असताना, गणेश भक्तांची ऊर्जा आणि ऊल्हास द्विगुणीत करण्यासाठी संगीतमय ‘श्री गणनायका’ सर्वांच्या भेटीस सज्ज आहे.