आपल्या नृत्याच्या अदाकाराने लक्ष वेधणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच वेगवेगळ्या नृत्यशैलीतून प्रेक्षकांसमोर येत असते. ‘अश्विनी राहूल इंटरप्रायजेस’ या सिनेमा निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित आणि के. विलास दिग्दर्शित ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी सिनेमाच्या मानसी नाईक एका धमाकेदार आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी पे’ असे बोल असणा-या या गाण्यावर मानसी नाईकने दिलखेचक नृत्य सादर केले आहे. या गाण्याचे वेगळेपण म्हणजे ‘रिक्षावाला फेम’ रेश्मा सोनावणे यांनी हे गाणे गायले असून याचे नृत्यदिग्दर्शन ‘डिआयडी’ फेम सिध्देश पै याने केले आहे.
के. विलास यांनी लिहिलेल्या या गीताला सलील अमृते यांचे संगीत लाभले असून नुकतेच आयटम साँगचे चित्रीकरण नायगाव येथील आर. डी. एल स्टुडिओत करण्यात आले आहे. ‘एकता एक पॉवर’ या सिनेमामध्ये सामाजिक एकात्मतेच महत्व सांगणारी कथा रेखाटण्यात आली आहे. सिनेमात राजेश शृगांपूरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर आणि विद्याधर जोशी या कलाकारांच्या भूमिका असणार आहे. दिग्दर्शक के. विलास यांनी सिनेमाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिले आहेत.
मानसीने यापूर्वी रेश्मा सोनावणे यांच्या आवाजातील वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर आपला जलवा दाखविला होता.रिक्षावालाप्रमाणेच ‘एकता एक पॉवर’मधील ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया’ हे गाणेही सर्वांना ठेका धरायला लावेल असा विश्वास मानसी नाईकने चित्रीकरणावेळी व्यक्त केला. मानसीसोबत हे आयटम साँग करताना खूप धमाल आल्याचे मत नृत्यदिग्दर्शक सिध्देश पै याने व्यक्त केले.