श्रेष्ठ कोण?

खेळ ही जगातील अशी गोष्ट आहे जिच्यात तुलना ही सतत होत असते. मग त्याला अपवाद कोणातच खेळाडू राहिला नाही. अगदी मोहम्मद अलींपासून ते सध्याचा भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहलीपर्यंत. दोन तुल्यबळ खेळाडू, तुल्यबळ कर्णधार यांच्या चर्चा अगदी गावातील पारापासून ते शहरातील एसी ऑफिसेस पर्यंत सगळीकडेच असतात. अशीच चर्चा भारतीय क्रिकेटची कर्णधार पदाची माळ विराट कोहलीच्या गळ्यात पडल्यानंतर सुरु झाली आहे. आणि साहजिकच ती तुलना अगदी सचिनपासून ते धोनी गांगुली सर्वांपर्यंत होत असते.
सचिनशी तुलना करण्यासाठी अजून तसा बराच अवकाश आहे. कारण विराटला मोठा टप्पा अजून गाठायचा आहे. पण हा तुलनात्मक विचार आपण धोनी, गांगुली आणि कोहली बद्दल नक्कीच करू शकतो.

 

सौरव गांगुली
सौरव गांगुली हा भारताचा ढोबळ मानाने पहिला असा कर्णधार होता ज्याने भारतीय संघाला विजय म्हणजे काय हे शिकविले. देश आणि परदेश दोन्ही भूमींवर भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली विजय मिळविले.
गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ कसोटी सामने खेळले. त्यात २१ विजय, १३ पराभव आणि १५ कसोटी सामने अनिर्णित राहिले.
गांगुली हा नेहमीच एक आक्रमक कर्णधार म्हणून ओळखला जायचा. स्वभाव आणि क्षेत्ररक्षणात अश्या दोनही आघाड्यांमध्ये आक्रमक असा गांगुली होता.
गांगुली ‘लीड फ्रॉम फ्रंट’ या वर्गात थोडा कमी येणार असा कर्णधार होता. पण एक जिंकण्याची जबरदस्त जिद्द गांगुलीकडे कायमच होती.

एमएस धोनी

एमएस धोनी हा बऱ्याच गोष्टींमध्ये गांगुलीच्या एकदम विरुद्ध होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ६० कसोटी सामने खेळले. त्यात २६ विजय, १८ पराभव आणि १५ कसोटी सामने अनिर्णित राहिले. ‘कॅप्टन कूल’ शांत स्वभावामुळे धोनीला मिळालेली पदवी. जेवढा धोनी स्वभावाने शांत तेवढाच क्षेत्ररक्षण आणि निर्णय घेण्यात आक्रमक. त्याच्या चाणाक्ष, चतुर निणर्यानांचे नेहमीचीच कौतुक होत राहिले. आणि त्याच परिवर्तन विजयात नेहमीच होत राहील. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून धोनीकडे जसे पहिले जाते तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तब्बल १८ कसोटी सामने हारलाही आहे. नवाब पतौडी यांनी सर्वात जास्त १९ कसोटी पराभव पहिले.

विराट कोहली

विराट कोहली आणि आक्रमकता हे दोन शब्द समानार्थी शब्द आहेत असच काहीस वाटत. विराटचा स्वभाव हा अतिशय आक्रमक आहे. प्रत्येक सामना जिंकावा अशी सकारात्मक मानसिकता विराटमध्ये आहे. विराट खऱ्या अर्थाने ‘लीड फ्रॉम फ्रंट’ प्रकारातील कर्णधार येतो. एकदम रिकी पॉन्टिंग सारखा. परंतु विराटच्या क्षेत्ररक्षणात धोनी किंवा गांगुलीची आक्रमकता थोडी कमीच. तो पटकन बचावात्मक पवित्रा घेतो. पण विराट टीममध्ये आहे असं म्हटलं कि समोरच्या टीमवर एक मोठं दडपण असतंच. २०१४ पासून कसोटी मध्ये कर्णधार म्हणून विराटने २५ सामन्यात १६ विजयांबरोबर ३ पराभव सुद्धा पहिले आहेत. परंतु विजयाच्या टक्केवारीत तो इतर कर्णधारांच्या बराच पुढे आहे.
कोणत्याही खेळाडूची श्रेष्ठता कायम त्या खेळाडूचा कालखंड आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. या तीनही कर्णधारानी भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुवर्णदिवस आणले एवढं मात्र खरं!