‘या’ दिवशी प्रदर्शित ‘बाळा’ चित्रपट

48

खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न घेता केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आग्रही असणारे पालक आपल्याच पाल्याची कारकीर्द धोक्यात आणतात. अशाच एका मुलाची कथा सांगणारा ‘बाळा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटामध्ये कलाविश्वातील मातब्बर कलाकार झळकणार असून मिहीरीश जोशी हा नवोदित कलाकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ख्याती असलेले दिवंगत ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर हेदेखील या चित्रपटामध्ये क्रिकेट प्रशिक्षकाच्या विशेष भूमिकेत दिसणार आहेत. बहुचर्चित ठरत असलेला हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बाळा’ या चित्रपटामध्ये क्रिकेटच्या ध्येयाने झपाटलेल्या बाळा या लहान मुलाची कथा सांगण्यात आली आहे. क्रिकेटच्या वेडापायी बाळा घर सोडून जातो आणि त्याची स्वप्न पूर्ण करतो. बाळा घरातून बेपत्ता झाल्यापासून ते वडील त्याचा शोध घेत असतात. मात्र त्याचे सारे प्रयत्न अयशस्वी ठरतात. दरम्यान, या कालावधीमध्ये बाळा मोठा क्रिकेटर होतो. घरापासून ते क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवण्यापर्यंतचा संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आला आहे. क्रिकेटवेड्या बाळाच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडून दाखवतानाच प्रत्येक मुलामध्ये एक जन्मजात क्षमता असते. फक्त त्या क्षमतेचा योग्य वापर होणं गरजेचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न ‘बाळा’ या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे.

सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिले आहे. छायांकन आर.आर प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे.

‘बाळा’ या चित्रपटाची निर्मिती करणारे राकेश सिंग यांनी याआधी भोजपुरी चित्रपट तसेच अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनीसुद्धा ‘माय फ्रेंड गणेशा’ याच्या चार सीरिजचे लेखन-दिग्दर्शन तसेच ‘भूत अंकल’, ‘भूत एज फ्रेंड’, ‘मैं कृष्णा हूँ’ या सारख्या अनेक लोकप्रिय बालचित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘बाळा’ चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांनी मराठीत पदार्पण केले आहे.

You might also like