Aditya Sarpotdar’s Marathi Movie ‘Classmates’ Muhurt

तरुणाई म्हटलं की जोश हा आलाच. तरुणाईचा हाच जोश, हाच उन्माद आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आगामी ‘क्लासमेट’ या मराठी सिनेमातून दिसणार आहे. एस. के. प्रोडक्शनचे संदीप केवलानी व्हिडियो पॅलेसचे नानूभाई म्हाळसा एन्टरटेनमेंटचे सुरेश पै यांची निर्मिती असलेल्या ‘क्लासमेट’ या चित्रपटात प्रेम, मैत्री, जोश, थरार, संगीत असा संगम पाहायला मिळणार आहे. तरुणाईचा चित्रपट असला तरी तो वेगळ्या धाटणीचा असणार आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त गाण्याच्या चित्रीकरणाने संपन्न झाला असून नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या बेला शेंडे यांनी या चित्रपटातील गाणं गायलं आहे. या भावस्पर्शी गाण्याचे बोल सिद्धहस्त गीतकार गुरु ठाकूर यांचे असून युवा संगीतकार अमित राज याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. ‘याद तुझी साद तुझी दरवळती श्वास तुझे जरा येऊनी या मनाला सावर रे ‘ असे बोल असलेल्या या गाण्यातून प्रेम भावना व्यक्त झाली आहे. मराठीतले तीन आघाडीचे संगीतकार या चित्रपटाला लाभले आहेत.
अविनाश- विश्वजीत, पंकज पडघन, अमित राज यांच्या जोडीला आरिफ- ट्रोय ही बॉलीवूड मधील ही युवा संगीतकार जोडी प्रथमच मराठी चित्रपटासाठी संगीत देणार आहे. तरुणाई आणि संगीत यांच एक अतूट बंध आहे. त्यामुळेच चित्रपटातील गाणी तरुणाईला भावतील अशा रीतीने केली आहेत. १९९४ चा कालावधी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच संगीत, वेशभूषा या सगळ्या बाबतीत एक वेगळेपण चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आजचे आघाडीचे तरुण कलाकार या यूथफुल सिनेमातून ३१ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहेत.