‘दुहेरी’ मालिकेतील फेमस अभिनेता “संकेत पाठक”चे रूपेरी पडद्यावर पदार्पण
स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहेरी या मालिकेतील प्रमुख कलावंत असलेला अभिनेता संकेत पाठक आता रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. छोटा पडदा ते मोठा पडदा हा प्रवास मराठी कलावंत नेहमीच करताना दिसतात. परंतु,आताच्या काळात छोट्या पडद्यावर दैनंदिन मालिकेसाठी दररोज कितीतरी काम करणे आणि त्याच वेळी रूपेरी पडद्यावर झळकणाऱ्या चित्रपटात काम करणे ही तशी अवघड बाब ठरते. परंतु, संकेत पाठक या अभिनेत्याने हे शक्य करून दाखवले आहे. सध्या त्याची दुहेरी ही मालिका छोट्या पडद्यावर दणक्यात सुरू असून मालिका संपण्याच्या अगोदरच मालिकेसाठी दररोज चित्रीकरण करतानाच त्याने ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाचे चित्रीकरणही यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
‘संतोष पानकर’ निर्मित आणि ‘विजय शिंदे’ दिग्दर्शित ‘दोस्तीगिरी’ हा मराठी चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. विनोद, नाट्य, प्रेम,हाणामारी, भावनिकता अशा विविध गोष्टींचे दर्शन घडविणारा हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाची कथा ही चार मित्रांची आहे. संकेत पाठक सोबत, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर , पूजा जैस्वाल अशी दमदार तरूण नवोदित कलावंत या चित्रपटात झळकणार आहेत. त्याशिवाय शुभांगी लाटकर आणि शरद पोंक्षे हे लोकप्रिय कलावंतही चित्रपटात पाहायला मिळतील. छोटा पडदा असो की मोठा पडदा किंवा रंगभूमी आपल्या वाट्याला आलेली कोणतीही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने लोकप्रिय करणारे अभिनेते शरद पोंक्षे ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
चित्रपटाची कथा प्रविण वाडकर यांनी लिहिली असून मनोज वाडकर यांनी पटकथा-संवाद लेखन केले आहे. वेंटीलेटर आणि अशा बऱ्याच चित्रपटांना संगीत दिल्यानंतर रोहन-रोहन यांनी दोस्तीगिरीतील गाणी संगीतबद्ध केली असून , ही गाणी गणेश चंदनशिवे, जय अत्रे, अक्षय शिंदे, सचिन आवटे यांनी लिहिली आहेत. आनंद शिंदे , आदर्श शिंदे, सावनी रविंद्र, प्राजक्ता शुक्रे, मिनल जैन, रोहन गोखले, रोहन प्रधान, कविता निकम यांनी गाणी गायली आहेत.
जनार्दन माने यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली असून,अनिकेत के. या चित्रपटाचे छायालेखक आहेत. कलावंतांच्या निवडीची महत्त्वाची जबाबदारी जनार्दन धुमाळ यांनी सांभाळली आहे. मैत्रीची संकल्पना एक वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली असुन, हा चित्रपट लोकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्मित्यांनी दर्शवला आहे.
Read This Article In English —> Click Here