‘सौ.शशी देवधर’… कोण असेल शशी देवधर? नुकत्याच दिसू लागलेल्या जाहिराती आणि प्रोमो पाहून चित्रपट जाणकारांसोबत सिनेरसिकांची उत्सुकताही कमालीची वाढलीय. ‘सौ.शशी देवधर’ असे शीर्षक असलेला हा सिनेमा नक्की कोणत्या विषयावर असणार आहे, याविषयीचे तर्क सध्या चित्रपट प्रेमीमध्ये लढविले जाताहेत. टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीच्या लूकमध्ये जाहिरातीत दिसणारी सई ताम्हणकर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. कौटुंबिक चित्रपटाला सस्पेन्सची जोड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर करीत असल्याने याविषयीचे कुतूहल जरा अधिकच पाहायला मिळतेय. चित्रपट निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजीत यांना त्यांचे पती अपरेश रणजीत व ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स प्रा. लि.’चे कृष्णा शेट्टी, नीता शेट्टी यांनी महत्वाची साथ दिलीय.
रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीतून ‘सौ.शशी देवधर’ चित्रपट साकारलाय. मराठीत बऱ्याच दिवसानंतर अशा शैलीतला चित्रपट पाहायला मिळणार असून याचे कथा लेखन आणि दिग्दर्शन केलंय अमोल शेटगे यांनी. ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स प्रा. लि.’ आणि ‘ऑरेंज ट्री प्रॉडक्शन प्रा. लि.‘ प्रस्तुत ‘सौ.शशी देवधर’ मध्ये अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शीकर, सई ताम्हणकर यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची पटकथा अमोल शेटगे व शर्वाणी – सुश्रुत यांची असून संवाद लिहिलेत कौस्तुभ सावरकर यांनी. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या यातील गीतांना ट्बी- परीक यांनी संगीत दिलंय. चित्रपटाची सहनिर्मिती सुरेश पै यांनी केलीय.
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा शिरोडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाच्या यशस्वी इनिंगनंतर त्यांनी ‘सौ.शशी देवधर’द्वारे मराठी चित्रपट निर्मितीत प्रवेश केलाय. लवकरच त्यांच्या या पहिल्या चित्रपटाचे कुतूहल शमणार आहे, कारण त्यांचा हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होतोय.