भरतचा ‘फेकमफाक’ लवकरच येत आहे तुम्हाला हसवायला !!

मराठी चित्रपटजगताचा ‘सुपरस्टार’ भरत जाधव हा ‘फेकमफाक’ हा आणखी एक नवा चित्रपट घेऊन जुलैमध्ये आपल्या भेटीस येतोय! ‘एमईएफएसी प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट कॉमेडी थ्रिलर आहे, ‘ फेकमफाक’ या चित्रपटात भरतबरोबरच विजय चव्हाण आणि विजू खोटे ही गाजलेली विनोदी दुक्कल आहे. या तिघांच्या विनोदानं प्रेक्षक खळखळून तर हसतीलच; पण त्याचवेळी चित्रपटातील रहस्य आणि थरार उलगडूनदाखवताना कथेने घेतलेली वळणं बघून त्यांना एकापाठोपाठ एक धक्केही बसत राहतील.
दयानंद राजन या बॉलीवुड गाजवणार्‍या दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीतील हे पदार्पण असून ‘फेकमफाकक’च्या दिग्दर्शनाबरोबरच लेखनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. हसते खेलते, अतीत, गिरफ्त, रातरानी आणि हसीनो का मेला हे दयानंद राजन यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटात एकूण चार गीते असून, सध्या गाजत असलेले ‘आयटम साँग’ मराठीतीलवैशाली सामंतने  गायलेलं आहे. शिवाय, बॉलीवुडमधील शान आणि साधना सरगमयांनी अन्य गीतांना स्वर देऊन या चित्रपटाच्या आकर्षणात भर घातली आहे.
भरत बलवली या उमद्या गायक कलावंतानं ‘फेकमफाक’च्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात आपल्याला ज्येष्ठ कलावंत अमिताभ बच्चन यांचा आवाजही ऐकायला येतो! पण तो स्वर अर्थातच सुदेश भोसले यांचा आहे… त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबरच आणखी चार जणांचे आवाज आपल्याला ऐकवले आहेत.
‘फेकमफाक’ही गोपीनाथ देसाई या मस्ती, मजा, धमाल करणार्‍या गमत्या विक्रेत्याची कहाणी आहे. हातात काहीच नसताना, त्यातून काही तरी गमतीदार उभं करून दाखवणारा असा हा विक्रेता आहे. रोजच्या दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या ग्राहकोपयोगी वस्तू विकणारा हा गोपी आपल्या परिसरात सर्वांचा आवडता आहे. गोपीचे वडील श्रीकांत देसाई हे गिरणी कामगार आहेत आणि आई सुलोचना व बहीण हेमा… असं हे चौघांचं प्रेमाच्या भावनांनी बांधलेलं कुटुंब आहे.
चित्रपटाची नायिका स्नेहा ही गोपीची प्रतिस्पर्धी! कारण ते दोघेही एकाच एजन्सीमध्ये ‘सेल्समन’ म्हणून काम करत असतात. स्नेहा ही घरातली लाडावलेली मुलगी आणि तिचं रोजच गोपीशी वाजत असतं! पण एका छोट्याशा मस्करीतून पुढे एक विदारक सत्य गोपीपुढे उभं ठाकतं आणि कहानी नया मोड लेती हैं..
येत्या जुलै मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.